मंत्री जनावरं नातेवाईकांकडे सोडायला सांगतात, मग दुष्काळ पाहाणीचा फार्स कशाला, धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

Foto

शिर्डी - एकीकडे गोरक्षणाची भाषा करायची आणि दुष्काळात जनावरं नातेवाईकांकडे सोडण्याचा सल्ला फडणवीसांच्या मंत्र्यांनी द्यायचा हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे सांगत विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंत्री राम शिंदे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही त्यामुळे केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहाणी  दौरा केवळ फार्स आहे. त्यांनी केंद्रीय पथकावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, उशिरा आलेल्या केंद्रीय पथकाचे दुष्काळी पाहणी दौरे म्हणजे केवळ फार्स आहे. सरकारचे मंत्री जनावरांना नातेवाईकांकडे जाण्याचा सल्ला देतात मग दुष्काळ पाहाणीचा फार्स कशाला करता. असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला. मनोहर भिडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवरुनही मुंडेंनी हे सरकार कोण चालवतं असा सवाल केला. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.  

 

केंद्रीय पथक म्हणजे निव्वळ फार्स 

केंद्रीय पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते निव्वळ औपचारिकता पूर्ण करत आहेत. केंद्रीय पथक एका गावांत फक्त दोन ते तीन मिनिटे जर थांबत असेल आणि रात्रीच्या अंधारात शेतांना भेटी देत असेल तर प्रशासन आणि सरकार दुष्काळाविषयी किती गंभीर आहेअसा सवाल धनंजय मुंडेंनी यावेळी उपस्थित केला.

 

मंत्री म्हणाले जनावरं नातेवाईकांकडे सोडा...

दुष्काळात जनतेला धीर देऊन मदत करण्याऐवजी चारा नसेल तर जनावरे नातेवाईंकाकडे किंवा शेजारी पाठवा’ असा सल्ला देणाऱ्या मंत्री राम शिंदे यांचा धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला. असे लोक जर सरकारमध्ये मंत्री असतील तर त्यांना दुष्काळाची तीव्रता काय कळणार आहे आणि शेतकऱ्यांचे दुःख यांना कसे समजणार असा सवाल मुंडेंनी केला. मंत्री राम शिंदे यांचे  वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आणि सरकार जनतेबद्दल किती संवेदनाहिन आहे हे दाखवून देण्यासाठी पुरेसे आहे असल्याचे मुंडे म्हणाले.  

 

संभाजी भिडेच सरकार चालवत आहेत...

राज्यापुढे अनेक मोठेमोठे प्रश्न आ वासून ऊभे असताना या सरकारमधील जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील जर भीमा-कोरेगांव प्रकरणातील संदिग्ध आरोपी मनोहर भिडे यांना भेटण्यात आपला वेळ खर्ची घालत असतील तर या सरकारची प्राथमिकता कशाला आहे हे स्पष्ट होतेअनेक प्रकरणात दोषी असूनही त्यांना क्लीन चिट मिळते, याचाच अर्थ तेच सरकार चालवत आहेत असेही आरोप मुंडे यांनी यावेळी केला.